Friday, December 11, 2015

अनोळखी ओळखीची माणसे ….


आमच्या  कन्या रत्नाचा  Art  & Craft  चा  जोमात  'अभ्यास' सुरु होता.  तेव्हा लक्षात आलं की तिची paper scissors बोथट झाली आहे. मी पटकन  बोलून गेले ---आपली साधी कात्री असती तर धारवाल्याकडून  मस्त धार लावून घेतली असती. "धारवाला" ही काय  भानगड आहे हे काही तिच्या लक्षात न आल्यामुळे तिनॆ मला नेहमीप्रमाणे प्रश्न विचारायला सुरुवात केली . "धारवाला म्हणजे काय, धार का लावतात, कशी लावतात  ---"इत्यादी इत्यादी … शेवटी मात्र ती म्हणाली की हे काका असतात कुठे  आणि ते आपल्याला भेटत का नाहीत . क्षणभर मी सुद्धा चक्रावले … मी स्वतः सुद्धा आता धारवाला बघून "य " वर्ष झाली असतील.

नंतर लेकही तिच्या खेळात मग्न झाली ,तिच्यापुरती तिला उत्तरं  आणि  नवी माहिती मिळाली, पण माझ्या मनातून विचार काही जात नव्हते.

सगळ्या चिमण्या गेल्या कुठे ---इतकंच धारवाला , वासुदेव , भोलानाथ (बुगु बुगु नंदी  बैल ), श्रावणातली 'आघाडा -दुर्वा -फुलेsssss  ' विकणारी मावशी ---कुठे आहेत हे सगळे लोक? वास्तविक ह्या सगळ्या लोकांवाचून माझं काही अडतंय असही नाही , पण उगाचच काहीतरी चुकल्या चुकल्यासारखा वाटून गेलं आज.
आपल्या रोजच्या बघण्यातही  कित्तीतरी सवयीची माणसे असतात . त्यांच्याशी आपण थेट बोलू , संवाद साधू असंही नाही . पण त्यांचं तिथे असणं ,  नुसतं दिसणं  हे सुद्धा फार आश्वासकच म्हणायला हवं .
उदा : मी रोज माझ्या office ला जाते तेव्हा एका सिग्नल पाशी एक बैलगाडीवाला असतो . बैलगाडीत बर्फाची लादी ठेवलेली असते. आणि आसपासचे हॉटेल मधले पोरे येउन बर्फ विकत घेउन जातात. मला जर  अगदी उशीर झाला असेल तर ती गाडी एक चौक पुढे  दिसते . कधी अगदी ५-१० मिनिटे इकडे तिकडे झाली तर साधारण गाडीत किती बर्फ उरलाय ह्यावरून वेळेचा अंदाजही बांधता यायला लागलाय … असे अनेक मित्र मी माझ्या रोजच्या घर ते ऑफिस ह्या प्रवासात बनवले आहेत. ही माणसे , ह्या जागा  आणि त्यांचं एखाद्या विशिष्ट ठिकाणी असण हे उगाचच आश्वस्त करतं ! अनोळखी असूनही उगाचच  ओळखीची झाली आहेत ही माणसं !
पुण्यात , सेनादत्त पोलीस चौकीपाशी कोपऱ्यावर फाटक्या कापडांच्या आडोश्याला एक आजोबा अनेक वर्ष फुले आणि हार विकायला बसलेले असायचे ..मी  आणि माझा नवरा बरेचदा त्या भागातून जातांना त्या आजोबांना अगदी मान मोडून अविरत काम करत असलेलं  बघायचो . एकदा  तर आम्हाला ते रात्री ११ वाजता  तिथे काम करतांना  दिसले. आम्हाला दोघांनाही आश्चर्य आणि नवल वाटलं …आजोबांना जाऊन  विचारलं --"आजोबा , रात्र झाली …किती  काम करता, उद्या सकाळी  लवकर या ना त्यापेक्षा  …" त्यांनाही कोणीतरी थांबून त्यांच्याशी बोलल्याचं बरं  वाटलं  असावं --" एक छानसं स्मितहास्य करून त्यांनी आमच्याशी  गप्पा मारल्या आणि  उत्साहानी एक  फुलपुडा ही बांधून  दिला. अश्यात बऱ्याच दिवसांनी त्या भागात जाणं झालं , तेव्हा तिथे ते खोपटही  नव्हतं  आणि आजोबाही दिसले नाहीत … आम्हाला दोघांनाही ते दिसले नाहीत म्हणून खूप वाईट वाटलं ।अशी  आशा आहे कि त्यांनी कुठेतरी दुसरीकडे मोठं दुकान थाटल असेल कदाचित .

तर अशी ही माणसं --नुसती रोजच्या सवयीची , रक्ताचं कुठलंही नातं नसलेली --पण उगाचंच  महत्वाची वाटणारी .
बदलत्या काळानुसार जुन्या कात्रीची धार गेली , तर नवी विकत आणण्याचा पर्याय प्रचलित झाला असेल कदाचित . आशा आहे की निदान माणसांच्या बाबतीत आपण आणि आपल्या पुढील पिढ्या इतपत "टाकाउ" वृत्तीचे होणार नाही.



No comments:

Post a Comment