Friday, March 11, 2016

अन्दमानचे "काळे" (??) पाणी


अन्दमानचे "काळे" (??) पाणी



भारतवर्षाला लाभलेले असे पृथ्वीवरचे नंदनवन म्हणून मोठया दिमाखात काश्मीर चे नाव घेतले जाते
नुकत्याच झालेल्या अंदमान -निकोबार च्या भ्रमन्तीअखेर मात्र मला असे प्रकर्षाने जाणवत आहे की भारताचा अजून एक  सुंदर ठेवा खूपच  दुर्लक्षित राहिला  आहे.
काश्मीरच्या एकूणच परिस्थीतीला असलेली राजकीय झालर पाहता, नेमके दोन्ही शेजारी राष्ट्र खरच त्या भूखंडासाठी भांडत आहेत, की तिथल्या लोकांबद्दलच्या आपुलकीपोटी की केवळ  स्वतःच्या शक्तीप्रदर्शनासाठी हा मुद्दा वेगळा !
काही का असेना ---काश्मीर इतके अंदमान निकोबार द्वीपसमूहाला वलयांकित वगैरे होण्याचे भाग्य आजवर प्राप्त झाले नाही हेच खरे ।

अंदमान द्वीपसमूहाला खरे सांगायचे तर निसर्गाचे एवढे भरभरून दान मिळाले आहे. पाचूच्या खड़यांसारखा  चमचमणारा  सुरेख समुद्र , समुद्राच्या डोहात असलेले अगणित प्रवाळ आणि जलचर ,नेटके रस्ते , टुमदार घरे , मोजकी वस्ती  आणि डिफेंसने अत्यंत शिस्तीत राखलेली एकूणच सर्व यंत्रणा यामुळे अचंभित व्हायला होते.  ते परिकथांमधे कसे , एखाद्या सुन्दर राजकुमारीला चेटकीणीचा  शाप वगैरे असतो तसेच काहीसे अंदमान नावाच्या अलौकिक भूमीला काळ्या पाण्याच्या तुरुंगामुळे एका अर्थी शापच मिळाला आहे असे वाटते.

त्या अथांग निळ्या समुद्राच्या काठी 'काळ्या पाण्याच्या' तुरुंगाची इमारत इतकी भेसूर आणि विदारक वाटते आणि त्सुनामीच्या तांडवात ह्या तुरुंगाची पडझड होऊनही तो पूर्ण जमीनदोस्त झाला नाही ह्याचे आश्चर्यही वाटत राहते .....कोण जाणे ह्या वास्तूत असलेल्या अनेक क्रांतीवीरांची पोलादी इच्छाशक्ती  ह्या वास्तूनी  आपल्या अंतरी सामावून घेतली आहे की काय आणि आजही  ही इमारत आपले पाय घट्ट रोवून उभी आहे, असा विचार माझ्या मनात येऊन गेला .

सेलुलर जेल चे प्रांगण 


भारताच्या स्वतंत्रता लढ्यात अनेक क्रांतिवीर होऊन गेले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे त्यातले एक अग्रगण्य नाव.  पन्नास वर्षे सीमापारीची काळ्यापाण्याची शिक्षा झालेले आणि ती अत्यंत खंबीरपणाने सामोरे जाणारे असे हे राजबंदी.

सेल्युलर जेल च्या स्मृती स्मारकाला भेट देतांना तेथील विविध ठिकाणी लिहिलेली माहिती , स्थानिक गाइड आणि लाइट एण्ड साउंड शो मधील समालोचन ह्यावरून एकूण त्यावेळी तुरुंगातील कैद्यांची हालपेष्टा याची कल्पना येते ... खरच, फक्त कल्पनाच येऊ शकते आपल्याला आणि कधी तरी वाटते की ती कल्पना झेलण्याची सुद्धा हिम्मत नाही आपल्यात!

जाड पोत्याच्या कापडांचे शिवलेले कपडे , खायला अत्यंत बेचव आणि बहुतांश वेळा कीड असलेल्या तांदळाची लापशी , दिवसभर घ्ाण्याला  जुम्पून रोजचा रतीब असेल तेवढे तेल काढणे , तेवढा रतीब  न भरल्यास जेवण न मिळणे , कोणी चुकार शब्द काढून प्रतिकार वगैरे केलाच तर अंगाचे कातडे सोलून निघेल अश्या एकाहून  एक भयानक शिक्षा आणि सर्वात अवघड  म्हणजे जीवघेणा एकांतवास।
सेल्युलर जेल हे नाव पडण्यामागे  अजुन एक कारण आहे --- एका मध्यवर्ती क्लॉक टॉवर पासून उगम पावणारे  सात स्पोक्स /विंग्स मधे ह्या इमरतीची रचना केली गेली आहे. प्रत्येक विंगच्या समोरच्या बाजूस पुढच्या विन्गेची मागची बाजू येईल अश्या  प्रकारे ही इमारत उभारली गेली।  हयामुळेच कुठल्याच सेल मधे असलेल्या कैद्याला दुसऱ्या कुठल्याच कैद्यांशी बोलण्याची सोय नव्हती। खुद्द विनायक दामोदर सावरकर ह्यांचे बंधू  ह्या कारावसात आहेत ह्याची दोघांनाही कल्पना तब्बल दोन वर्ष आली नाही। सावरकरांच्या क्रांतीकारी लेखनामुळे आणि त्यांच्या प्रभावी वक्तृत्वामुळे त्यांना शक्य तितके मानसिक आणि शारीरिक रित्या खचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला। त्यांना सगळ्यात कोपऱ्याच्या अंधार कोठडीत ठेवण्यात आले जिथुन फाशी गृहाची थेट खिड़की नजरेच्या टप्प्यात होती.सावरकरांनी आपल्या अनेक सहकाऱ्यांना फासावर जातांना ह्या कोठडीतून पाहिले.

आधी संगितल्याप्रमाणे सर्व कैद्यांना एकांतवासात ठेवण्याची सर्व खबरदारी तेथील अधिकाऱ्यांनी घेतली होती। . अशी एक आख्यायिका आहे की रोज एक बुलबुल पक्षी सावरकरांच्या कोठडीतील  उंचावरच्या छोट्या खिडकीजवळ येई. आपल्या घासातला घास रोज नित्य नेमाने ह्या पक्ष्यासाठी ते बाजूला काढून ठेवत .तांदुळाच्या चिकट लापशीला ते छताला एका कोपरयात  चिकटवून ठेवत। सकाळ झाली की उन्हाच्या पहिल्या वहिल्या किरणांनी तो घास तापून  मऊ होई आणि बरोबर खिडकीत खाली पड़े. तो बुलबुल सुद्धा रोज न चुकता हजेरी लावीत असे . माइक्रोवेव ओवन च्या तोंडात  मारेल असा हां किस्सा ऐकून मी  बेहद्द खुश झाले. :)
माणसाला जेव्हा आपले  असे  कोणी आप्त स्वकीय जवळ नसतात तेव्हा एखाद्या पक्ष्याची किलबिल सुद्धा मनाला उभारी देऊ शकते  हा विचार किती मोठा आहे. आपल्या जवळ कोणी नाही म्हणून कुढत  बसण्यापेक्षा आपल्या जवळ जे कोणी आहे त्याला आपले करणे ,त्याची काळजी घेणे ही गोष्ट किती हृदयस्पर्शी आहे. ह्यासाठी सावरकरांसारखे कणखर आणि तितकच तरल मन हवे !

सावरकरांची कोठडी 


सावरकरांच्या कोठडीतील पलंग (?) आणि खाण्यासाठी ताटल्या 

त्यांच्यावर होत असलेल्या मानसिक आणि शारीरिक यातना झेलत असतांना त्यांनी त्यांच्यातल्या कविला मोठ्या ताकदीने जिवंत ठेवले. त्यांना कुठलीही लेखन सामग्री मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले होते. ह्या अडचणीला न जुमानता त्यांनी काटे आणि खिले  वापरून भिंतीवर सुमारे दहा सहस्त्र ओळींचे "कमला काव्य" नावाचे महाकाव्य रचले.  आयुष्याची १० सोनेरी वर्ष काळ्या पाण्याच्या तुरुंगात घालवताना ह्या वीरपुत्राने आयुष्यात महाकाव्य रचायचे मनोरथ पूर्ण करून घेतले आणि त्या प्रत्येक अंकुश टाकू पाहणाऱ्या वृत्तीला एक सणसणीत चपराक मारली. 
केवढा ह्या माणसाचा आशावाद आणि  केवढी वाखणण्यासारखी जिद्द !
कमला काव्य ---भित्तिचित्र 




४  जुलाई १९११ ते २ मे १९२१ हा कालावधी ते ह्या तुरुंगात राजबंदी म्हणून होते . सावरकरांप्रमाणे इतर अनेक कैदी ह्या बंदीगृहात अनेक वर्ष होते. काही खचले , काहींची कत्तल झाली , काही फासावर गेले आणि काही निवडक बाहेरही पडले. आपण आज जे स्वातंत्र्य एवढे गृहीत धरतो, त्यासाठी किती थोर लोकांचे हातभार लागलेले आहेत ह्याची आपण जाणीव ठेवणे गरजेचे आहे. 

 माझी तर तुम्हा सर्वांना विनंती आहे ---की केव्हातरी अंदमान च्या सुंदर निसर्गासाठी , समुद्रासाठी  तर तिकडे नक्कीच जा , पण जेव्हा जाल तेव्हा  स्मारकाला भेट देऊन ह्या थोर क्रांतिकारी व्यक्तींना आदरांजली देऊन यायला विसरू नका. मला खात्री आहे की कितीही भयानक ,  क्रूर इतिहासावर बेतलेला ह्या भूमीचा भूतकाल का असेना ---तो सरतेशेवटी दुर्दम्य आशावाद , निर्भयता आणि सचोटीची भावना मनात निर्माण करण्याइतपत नक्कीच सक्षम आहे. 

सावरकरांच्या स्मृतीस माझे लाख लाख प्रणाम !










No comments:

Post a Comment