Tuesday, September 8, 2009

आई

आई-ह्या विषयावर लिहावे तितके थोडेच आहे. प्रत्येकाप्रमाणे मला सुद्धा माझी आई प्रिय आहे. एवढे मोठे होउन सुद्धा अजुनही आईच्या सल्ल्याची, तिच्या मतांची गरज पड़ते.
आमच्या घरात , आम्हा तिघी बहिणींना मिळाल्या नसतील एवढ्या ट्रॉफीज आमच्या आईला मिळाल्या आहेत. बुद्धिबळ, टेबल टेनिस ह्यात आमची आई चैम्पियन, त्यामुळे आम्ही सहसा आमच्या आईशी बुद्धिबळ वगैरे खेळायचे टाळतो , कारण ३-४ खेळ्यांमधेच आम्हाला धोबीपछाड मिळते . तिचे वाचन सुद्धा अफाट आहे, कामातून वेळ मिळेल तेव्हा ती काही ना काही वाचत असते . गाण्यात तिला विशेष रस आहेच..शिवाय ती स्वतः एक उत्तम गायिका सुद्धा आहे. आता एवढे सगळे ऐकून तुम्ही म्हणाल , की हिची आई गृहिणी असणार - म्हणुन तिला एवढा वेळ मिळत असेल . तर ते सुद्धा साफ़ चूक. तब्बल ३०वर्ष एका प्रथितयश शाळेत, माझी आई शिक्षिका म्हणुन नोकरी करत होती आणि त्यातली सुमारे १० वर्ष तिने मुख्याध्यापिका म्हणुन पदभार सांभाळला. या कारकीर्दीत अनेक मुलांची आयुष्य आमच्या आईच्या हातून घडली. जगाच्या पाठीवर कुठेही गेली- तरी आईच्या चार ओळखी निघताताच.

तसे पाहिले तर रसायनशास्त्र हा तिचा मुख्य विषय, पण साहित्याची आणि भाषेची सुरुवातीपासून विलक्षण ओढ़. निवृत्ति नंतर सुद्धा तिने सतत स्वतःला अनेक गोष्टीत गुंतवून घेतले आहे . मध्यंतरी तिचे स्वतःच्या कवितांचे पुस्तक प्रकाशित झाले. प्रचंड इच्छाशक्ती , विलक्षण उत्साह आणि कमालीची जिद्द ह्या गोष्टींच्या बळावर अजुनही नव्या गोष्टी शिकायची इर्ष्या तिच्यात आहे.
मध्यंतरी मला मोठ्या उत्साहाने तिच्या "parasailing" च्या अनुभवाबद्दल सांगत होती...आणि इथे मी "roller coasters " ची भीती वाटते म्हणुन तिला सांगत असते.

आज आई बद्दल लिहायला बसले आणि शब्द मात्र थिटे पडत आहेत.किती लिहू न काय लिहू असे झाले आहे . हे म्हणजे लहानपणी व्हायचे तसे झाले--- शाळेत निबंधाचा विषय द्यायचे.संपूर्ण निबंध मी एकटी लिहिणार असा निर्धार करून घरी यायचे अन् ५ मिनिटात आई कडेच मदतीसाठी धाव घ्यावी लागायची. :-) आजही आईकडूनच आई बद्दल लिहायला शब्द उसने घ्यावे लागत आहेत.वास्तविक पुढील कविता माझ्या आईने तिच्या आईसाठी रचली आहे , पण आज आईसाठी लिहायला माझ्याकडे याहून सुन्दर शब्द नाहीत.


आज शब्दांची पालखी, माझ्या दारात थांबु दे,
माझ्या माउलीची पूजा, मला शब्दात बान्धु दे.
कशी वेचू शब्दफुले? आणु कोणता मी गंध ?
मृद्गंध का कोणी केला कुपीमधे बंद!!
आठवणींचे हे आज उगाळीले मी चन्दन
आणि मनोमन आई केले तुला मी वंदन !
प्रेम पुष्पहार जरी तुझ्यासाठी मी ओविला ,
माझ्या गळा मिठीचीच , आई अपूर्वाई तुला .
तुझ्या ओच्याशी रेंगाळे, माझे सारे बालपण
तुझ्यापाशी येता माझे, विसरते मोठेपण!
तुझ्या मायेच्या घासाला, चव येई अमृताची
मायबाई माझी असे, जागा माझी विसाव्याची.
नान्दतेस गोकुळात, कर्तेपणाचा वावर
साऱ्या घरादारावर, तुझी मायेची पांखर
सगळ्यांची आठवण, तुला सार्‍याचे कौतुक,
माय बाई माझी आहे, शुभंकर हे स्वस्तिक
आशीर्वाद हात तुझा , मिळो आम्हा साऱ्या जणा
आयुरारोग्य लाभों तुला , देवापाशी ही प्रार्थना

- सौ वीणा पुरोहित

Thursday, September 3, 2009

पश्चिमायन..

कामा निमित्त, सहलीला म्हणुन,  देशाबहेर  भटकंती ही हल्ली बर्‍यापैकी सामान्य गोष्ट समजली जाते.कोणी परदेशात जायला निघाले की आताशा पूर्वीसारखे अप्रूप वाटत नाही.म्हणा हल्ली प्रवास करणेही बरेच सुकर झाले आहे. विमानाची तिकिटे आणि इतर सर्व आरक्षण व्यवस्था, घर बसल्या इन्टरनेट वापरून होऊ शकते.
३०-४० वर्षांपूर्वी परिस्थिती अशी नव्हती. पूर्वी कोणी परगावी कामाला गेले तरी "आमचा मुलगा लढाईवर निघालाय" ,असा  अविर्भाव असे ! कोणी परदेशी गेले तर विचारूच नका ! :) भारताबाहेर स्थायिक होणारे तर अगदी बोटावर मोजता येतील एवढेच.
माझे आत्या काका या निवडक भारतियांपैकी एक होते.

आमच्या काकांकडून, त्यांच्या अनोख्या परदेश प्रवासाचे किस्से मी अनेकदा ऐकले आहेत आणि अजुनही बोलता बोलता हा विषय निघाला तरी आम्ही  "काका , हे कितीदा तरी सांगितले आहे तुम्ही" असे म्हणुन त्यांना थांबवत नाही. अजुनही त्या गोष्टी तितक्याच रंजक वाटतात !

सुमारे ३५ वर्षांपूर्वी माझ्या आत्या काकांचे लग्न झाले.काकांना उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतल्या "युनिवर्सिटी ऑफ़ यूटा " इथे शिष्यवृत्ती मिळाली होती.दोघांचेही पासपोर्ट -व्हिसा काढायला मुम्बईच्या पासपोर्ट ऑफिसात खेटे मारावे लागत होते. शिवाय आमचे काका स्वतः विद्यार्थी म्हणुन अमेरिकेत येणार होते. त्यांच्या हातात पक्की नोकरी नसल्याने बरोबर बायकोला घेऊन जाता येइल की नाही ह्याची सुद्धा धड खात्री नव्हती . पासपोर्ट ऑफिसात सुद्धा दर महिन्यात, "पुढच्या बुधवारी या, तोवर तुमचे कागदपत्र नक्की तयार असतील" , हे नेहेमीचे उत्तर पाठ झाले होते. पुढच्या बुधवारी नक्की काम होईल अशी आशा घेऊन ,बघता बघता ६ महिने झाले. शेवटी एकदाचे पासपोर्ट ताब्यात मिळाले! पासपोर्टच्या कटकटी पाहून, आपला व्हिसा होईल की नाही ह्याची सुद्धा धास्ती वाटायला लागली होती. व्हिसाच्या मुलाखती साठी काकांना बोलावले , तेव्हा कोंसुलेट मधील अधिकारी म्हणाला - "तुमची शिष्यवृत्ती तर आहे, पण तुमच्या बायकोला व्हिसा देता येणार नाही , कारण त्यांना शिष्यवृत्ती / नोकरी नाही ." काकांच्या डोक्यात काय विचार आला,  कुणास ठाऊक.
त्यांनी चक्क थाप मारली- " माझ्या बायकोचा अर्ज काही यूनिवर्सिटीज़ मधे पाठवला आहे आणि केव्हाही त्यांचे पत्र अपेक्षित आहे." तसेही ३ महिन्यानी माझी  आत्या सुद्धा अर्ज भरणार होतीच आणि शिष्यवृत्ति मिळवून प्रवास करणार होती . पोकर मधे "ब्लफ" करतात, तसे आपले काकांनी थाप ठोकून पाहिली. फार तर फार काय होईल , हा माणूस बायकोचा व्हिसा देत नाही एवढे म्हणेल.
नशिबाने त्या अधिकर्‍याचा  काकांच्या बोलण्यावर विश्वास बसला आणि दोघांचा व्हिसा झाला. अर्धी लढाई जिंकल्याची भावना घेऊन दोघे पुढील तयारीला लागले.पैशांची जमवा जमाव ,कपडे खरेदी, कागदपत्रे, पुस्तके, औषधे .ह्याच  तयारीबरोबर  अजुन  एक  दिव्य  बाकी  होते   ! ते म्हणजे प्रवासाची तिकीटे.
पासपोर्ट आणि व्हिसाची कामे रेंगळल्यामुळे , तिकीटे काढायला सुद्धा बरीच घाई झाली . त्या काळात "एयर इंडिया" चे तिकीट काढले तरच परदेशी चलन मिळत असे. नेमके एअर इंडिया ची सर्व तिकिटे संपली होती.
तिकीट खिडकीतला माणूस म्हणाला : "साहेब काही काळजी नको, अहो विमानतळावर मिळेल परदेशी चलन" . त्या माणसाच्या आश्वासनावर विसंबून राहून , अमेरिकेची दोन तिकिटे काढली. बघता बघता प्रवासाचा दिवस उजाडला . आहेत नाहीत तेवढे सर्व  पैसे विमानतळावर डॉलर मधे रूपांतरित करून  घेऊ, असे म्हणून दोघे निघाले .
विमानतळावर पोचल्यावर कळले की प्रत्येकी फक्त 8 डॉलर एवढेच चलन विमानतळावर मिळू शकते. त्यामुळे दोघांचे मिळून फक्‍त  16 डॉलर घेऊन प्रवास करावा लागेल अशी नवी माहिती प्रवासाच्या आधी 2 तास कळली. उरलेले भारतीय चलन, विमानतळावर सोडायला  आलेल्या नातेवाईकांबरोबर परत पाठवून दिले.
आता आपण साधे गावाला जाताना अडी अडचणीला जास्त पैसे घेऊन निघतो, इथे तर ही दोघे परदेशी निघालेली  आणि ते सुद्धा अवघे 16 डॉलर खिशात घेऊन!
विमानात बसल्यावर काका म्हणाले  " अमेरिकेत गेल्यावर बघून घेऊ , शिष्यवृत्तीचे पैसे आगाऊ मागून घेऊ हवे तर. आणि विमानात काय खायला प्यायला असतेच की ! " थोडा वेळ नुसती खिडकीतून बाहेरच्या ढगांचे डोंगर पाहण्यात गेला...थोड्या वेळात त्याचीसुद्धा मौज वाटेनाशी झाली . काही वेळात विमानातली "डिनर सर्विस" सुरू झाली . जेवण झाल्यावर आपले विमानाच्या तिकिटाचे पैसे वसूल करावे अश्या आपल्या मराठमोळ्या विचाराने, कोल्ड ड्रिंक मागवयाचे ठरवले. कोल्ड ड्रिंक संपले तोच, हवाई सुन्दरीने येऊन कोल्ड ड्रिंकचे 3 डॉलर झाले म्हणून घोषणा केली. कोल्ड ड्रिंक पिऊनही दोघांचा घसा कोरडा पडला. पैसे वसूल करायची आइडिया अंगाशी आली. उलट 16 पैकी 3 डॉलर विमान कंपनीच्या घशात गेले.
आता काही अजुन मागवायला नको म्हणून निमूटपणे दोघे बसून राहिले.
कसेबसे हातातले पैसे जपत दोघे एका मोठ्या प्रवासानंतर यूटा मधे पोचले . तिथे काही ओळखीचे मित्र दोघांना घ्यायला विमानतळावर आलेच होते. त्यांना पाहून दोघांनाही हायसे वाटले.

अश्या रोमांचक गोष्टी ऐकून प्रत्यय येतो की कित्तीतरी गोष्टी आता बदलल्या आहेत. माझे लग्न झाल्यावर २ दिवसात माझा व्हिसा माझ्या ताब्यात मिळाला , आणि सहाव्या दिवशी आम्ही एकत्र अमेरिकेत येऊ शकलो. गोष्टी सोप्प्या झाल्यात , पण त्याचा अर्थ संघर्ष संपले, असा होत नाही . मला असे  कित्येक लोक माहीत आहेत जे "ग्रीन कार्ड" येइल या आशेत अनेक वर्ष भारतात जाऊ शकत नाहीत.  नाहीतर त्यांचे ग्रीन कार्ड चे चालू असलेले काम फुकट जाते .तिकडे भारतात आई वडील वेड्या आशेवर असतात की लवकरच परत येतील.
इतरांचे काय - मी सुद्धा माझ्या "dependent" व्हिसा वर   नोकरी करू शकत नाही. वर्क परमिट साठी सुद्धा कधी एक एक वर्ष मधे जावे  लागते . आणि ते सुद्धा सर्व लॉटरी च्या कृपेवर वर अवलंबून  की तुम्हाला वर्क परमिट मिळेल की नाही. ज्यांची नोकरी आहे अशी काही  जोडपी , नोकरी निमित्त एकमेकांपासून लांब रहातात आणि फक्त शनिवार रविवार एकमेकांना भेटतात.  इथे प्रत्येकाला काही ना काही संघर्ष आहे. इथले सरकार  आणि इम्मिग्रेशन :कधीतरी आपल्यावर प्रसन्न होउन आपले काम होइल, ह्या आशेवर अनेक लोक झुंजत रहातात. प्रत्येकाला इप्सित असे फळ प्राप्त होते , असे नाही.

तात्पर्य काय, कार्य प्रणालीत पडायचे ते फरक पडले. काही गोष्टी सोप्प्या झाल्या, काही अवघड, पण पश्चिमायनातला  संघर्ष कोणालाच चुकला नाही आणि भविष्यातही चुकेल असे वाटत नाही!!!

Thursday, August 27, 2009

ब्लॉग पहावा लिहून .....

                        II श्री II
ग्न  झाल्यापासून माझा "इ संचार" बराचसा कमी झालाय अशी तक्रार मी माझ्या मित्र-परिवारा कडून ऐकत आहे. पण खर सांगू का...हल्ली मी या गोष्टींचा फारच  धस्का घेतलाय. एक ते ऑरकुट कमी म्हणुन का काय ,फेसबुक, माय-स्पेस ,ट्वीटर इत्यादी गोष्टींना ऊत आला आहे . इथे घरातली आणि बाहेरची कामे उरकता उरकता नाकी नऊ  येतात, त्यात अजून "आज बाजारात  भाजी महाग/स्वस्त मिळाली हो "  किंवा  "आत्ता माझी रजा साहेबानी रद्द केली हो  "असला 'ट्वीट' करून जगभर जाहिरात करायचा विचार खरच मनातही येत नाही.
पण अगदीच ' ब्याक्वर्ड ' झालोय हल्ली आपण असा विचार येऊन आज माझ्या पहिल्या ब्लॉगचा मी श्री गणेशा करायचे ठरवले. बदलत्या काळाबरोबर बदलायला हे हवेच, नाही का? अर्थात ब्लॉग लिहायच्या मागे नुसती  : आपण  काळाबरोबर बदलत नाही , एवढी भीतीची भावना नव्हती. माझ्या अनेक जवळच्या लोकांचे  सुरेख ब्लॉग वाचायचा योग अशात आला ...आणि वाटले - की काय हरकत आहे अधून मधून आपणही थोड़े लिहायला !!!

जेव्हा लिहायला बसले तेव्हा  ह्या ब्लॉगचे नुसते नाव ठरवण्यात मी तब्बल १ -१.५ तास खर्ची पाडला...भपकेदार, सामान्य , टुकार, फिक्कट अशी अनेक बिरुदे लावून मी अनेक संभाव्य नावांना मोडीत काढले .एकूण अंदाज आला आहे की वाटते तितके ब्लॉग हे प्रकरण लिहिणे सोपे नसावे . "घर पहावे बांधून अन् लग्न बघावे करून " इतकेच "ब्लॉग पहावा लिहूनही" अवघड आहे! आज लिखाणाचा पहिलाच दिवस आहे , म्हणुनच ओढून ताणून अजून पाल्हाळ लावत नाही.

आणि हो --ब्लॉग आवडला की नाही याची नोंद जरूर करा !! आपला सर्वांचा अभिप्राय अर्थातच बहुमूल्य आहे . राम राम . आजच्या साठी एवढच. पुन्हा भेटूच !


                                                    II इति वार्ता: II